दिवाळी फराळाची पूर्व तयारी

   

   दिवाळीत फराळाची जर आधीपासून तयारी आणि नियोजन केले तर ऐनवेळी गडबड अन तारांबळ होणार नाही. सर्वसाधारण प्रत्येक घरात जे पदार्थ केले जातात त्यानुसार इथे काही गोष्टी सुचवते.

      सर्वप्रथम किराणा सामान घरी भरुन ठेवावे. दिवळीपूर्वी कमीताकमी तीन आठवडे हे सामान आधी आणले तर हळू हळू गृहिणीला तयारीला सुरुवात करता येईल. नाहीतर काहीवेळेस अगदी गॅसपाशी फराळ करणे सुरु झाल्यावर काही जिन्नस घरात नाही हे कळते.

      त्यासाठी वाणसामान लिस्ट देत आहे – साखर, गुळ, शेंगदाणे, डाळवं, तीळ, बारीक रवा, मैदा, चनाडाळ आणि बेसन, खोबरे, जाड व पातळ पोहे, मक्याचे पोहे, चुरमुरे, भाजके पोहे, तेल, तूप, धने, जीरे, ओवा, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, विलायची, जायफळ, खसखस, तयार चिवडा मसाला, व गोड पदार्थात घालायचे सुके मेवे – काजू, बदाम, पिस्ते, चारोळी, मनुका इ. करंजीच्या साठ्यात लावण्यासाठी कॉर्नफ्लॉवर पावडर आणि रेडीमेड गुलाबजामुनचे मिक्स व मिल्क पावडर.

      रोजच्या स्वैपाकातील बेसिक पदार्थ तर घरी असतातच. असे सामान घरी आले की गृहिणीला तयारीला वेळ मिळतो. ती पूढील प्रमाणे तयारी करु शकते –

1. तांदूळ व डाळी धुवुन, सुकवून त्याची भाजणी तयार करुन दळून आणणे.

2. बेसन पिठ विकतचे वापरत नसाल तर चनाडाळ दळून आणणे.

3. तांदूळ पिठी कशात वापरत असाल तर ती दळून आणणे.

4. साखर मिक्सरमध्ये किंवा छोट्या घरघंटीवर दळून आणणे.

5. विलायची हलकी भाजून चमचा दोन चमचे साखरेसोबत मिक्सरवर पुड करुन ठेवणे.

6. चिवड्यासाठी पोहे चाळून ठेवणे.

7. धने व जीरे वेगवेगळे भाजून त्याची पुड करावी. काही ठिकाणी धने व जीरे पुड एकत्रच करतात, पण अशी वेगळी वेगळी पुड केली की जीरे पुड कधी उपवासाच्या पदार्थातही वापरता येते.

8. चिवड्यात घालण्यासाठी सुक्या खोबर्‍याचे पातल काप करुन ठेवणे तसेच करंजीच्या सारणात घालण्यासाठी खोबर्‍याचा कीस करुन ठेवणे.

9. शेंगदाणे भाजून कुट तयार करणे.

10. करंजीमध्ये घालण्यासाठी सारण तयार करणे.

11. सुक्यामेव्याचे काप करुन ठेवणे.

12. चिवड्यात घालायचे डाळवं व शेंगदाणे स्वच्छ करुन ठेवणे.

13. अनारशासाठी तांदुळ भिजत घालणे.

14. दळण आणतांना गहू, ज्वारी व डाळी पिठ ऐन दिवाळीत संपणार नाही अशा रितीने आणून ठेवावे.

15. वापरात नसलेल्या तळणाच्या कढया, पातेली आधीच काढून स्वच्छ करणे.

16. चकली, शेवेचा सोर्‍या काढून घासून ठेवणे व चेक करणे. कधी कधी ऐनवेळेस त्याची स्प्रिंग तुटलेली असते किंवा सोर्‍या जाम झालेला असतो.

17. दसरा दिवाळीच्या आधी स्वच्छता करतांना, डबे वगैरे घासतांना काही डबे फराळाचे पदार्थ काढायला रिकामे ठेवावेत म्हणजे ऐनवेळी गडबड होणार नाही.

18. आठ दिवसाची भाजी फ्रिजमध्ये निवडुन ठेवणे.

19. तिखटाचे पदार्थ करतांना सर्वात शेवटी चिवडा करावा म्हणजे तळणीचे तेल चिवड्यात वापरता येईल.

* ह्या तर झाल्या फराळाच्या टिप्स. यासोबतच काही इतर दिवाळीची तयारी : उटणे, सुगंधी तेल, सुवसिक साबण, अत्तर, वेगवेगळे दिवे, तोरण, आकाशकंदील (जुना वापरणार असाल तर साफ करुन घ्यावे), रांगोळी – रंगीत व पांढरी, पितळी दिवे आधीच साफ करुन ठेवावे, नवीन मातीच्या पणत्या वापरत असाल तर एक दिवस पाण्यात घालून ठेवावे म्हणजे त्या तेल कमी पितील, कापसाच्या वाती दिव्यांसाठी तयार ठेवाव्यात, फुलवाती तुपात भिजवून ठेवणे.

* लक्ष्मी-पूजनाचे साहित्य : फोटो व शिक्का वगैरे काढून ठेवणे, औक्षणाचे ताट काढून ठेवणे.

      अशी ही दिवाळी फराळाची तयारी केली की ऐनवेळी होणारी धांदल टाळता येईल. ताण न घेता, गडबड गोंधळ न होता रिलॅक्सपणे दिवाळी साजरी करु शकू.

Diwali Faral Tips video: https://youtu.be/hFakcb_fEKs

धन्यवाद.

वर्षा कंधारकर

औरंगाबाद.

 

Comments

Post a Comment