दिवाळी फराळ - चकली

 

                सर्वप्रथम सर्वांना वर्षाज हाऊस ऑफ फुड्स तर्फे दिवाळीसाठी हार्दिक शुभेच्छा! 2020 हे वर्ष जवळपास सर्वांनाच खूप कठिण गेले आहे. करोना व इतर सर्व संकटापासून लवकर सुटका होवो व येणारा काळ सर्वांना सुख समृद्धी व भरभराटीचा जावो ही प्रभूचरणी प्रार्थना करुन मी माझ्या या पहिल्याच ब्लॉगला आज सुरुवात करीत आहे.

      अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली दिवाळीच्या फराळाची परंपरा आहे. या दिवसात असलेल्या सुंदर वातावरणात फराळाला फार महत्व आहे. या काळात मित्र परिवार व नातलग एकत्र जमत असल्यामुळे वेगवेगळ्या पदार्थांची फराळासाठी घराघरात रेलचेल असते. कितीही काळ बदलला, पाश्चात्यांचे अनुकरण झाले, तरीही या पास्ता-बर्गर-पिझ्झा-नुडल्सच्या जमान्यात भरपूर टिकणारे खमंग व चविष्ट असे पारंपारिक पदार्थ मात्र खूप आवडीने खाल्ले जातात. तर याच फराळातील एकेका पदार्थाबद्दल इथे माहिती देत आहे. दिवाळीच्या फराळातील सर्वांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ म्हणजे चकली. चकली परफेक्ट  बनवण्याच्या काही टिप्स..

चकली :

हा एक महाराष्ट्रीयन खास पदार्थ आहे. चकली अनेक प्रकारानी केली जाते. पण मुख्यत: भाजणीपासून केलेली चकली लोकप्रिय आहे. भाजणी करायच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. यात मुख्यत्वे तांदूळ, चनादाळ, उडीददाळ व मूगदाळ इ. चा वापर होतो. चकली भाजणीमध्ये धान्य व डाळी जास्त न भाजता थोडेसे भाजायचे कारण आपण नंतर चकली तळूनच घेतो. कमी भाजल्याने चकलीचा रंग पण छान रहातो. चकलीसाठी शक्यतो जाडसर तांदूळ वापरावा. चनादाळ दळल्यानंतर चकलीची भाजणी दळावी, म्हणजेत गिरणीत इतर धान्य आधी दळले असतील तर ते भाजणीत मिक्स होणार नाही. भाजणीचे पिठ जाडसर नसावे. भाजणी करतांनाच त्यात जीरे व धने टाकावेत. ओवा आणि तीळ पिठ भिजवतांना त्यात घालावे. ओवा डायरेक्ट घालायचा नसेल तर ओवा पाण्यात उकळून गळून ते पाणी चकलीचे पिठ भिजवतांना घालू शकता. चकलीत अगदी चिमुटभर हळद घालावी, म्हणजे रंग चांगला येतो.

फक्त भाजणी चांगली असून चालत नाही, पिठ भिजवतांना ते भिजवायची पद्धत, मोहन, यावर चकली क्रिस्पी होणे अवलंबून असते. अन्यथा चकली मऊ किंवा कडक होण्याचा संभव असतो. चकल्या तळतांना तेल चांगलं तापलेलं पाहिजे. चकली तेलात घातल्यानंतर तेलाचे तापमान कमी होते, त्यामुळे तेलात चकली सेट झाल्यानंतर गॅस मेडियम करावा, अन सोनेरी रंगावर चकल्या तळाव्यात. तेलाचे बुडबुडे एकदम कमी होईपर्यंत दोन्ही बाजूंनी चकल्या तळून घ्याव्यात म्हणजे मऊ पडणार नाहीत. कमी तापलेल्या तेलात चकली घातल्यास ती विरघळते. चकली तेलात सेट होईपर्यंत तिला उलटवायची घाई करु नये.

चकलीचे पिठ भिजवतांना थोडेसे कोरडे पिठ बाजूला शिल्लक ठेवावे. कारण पहिली चकली तेलात घातली की लक्षात येते चकली कडक वा मऊ झाली, म्हणजेच मोहनचे प्रमाण कमी किंवा जास्त आहे, अशावेळेस जर चकली ठिसूळ झाली असेल, तेलातच तुकडे पडत असतील तर मोहन जास्त झाले असे समजावे. तेव्हा भाजणीचे कोरडे पिठ भिजवलेल्या पिठात मिक्स करुन त्याच्या चकल्या कराव्या. आणि तळल्यानंतर चकली जास्त कडक वाटत असेल, तर त्यात अजून थोडेसे मोहन घालावे. म्हणजे चकली कुरकुरीत होईल.

तळलेल्या चकल्या थंड झाल्यानंतर घट्ट झाकणाच्या डब्यात त्या ठेवाव्यात. अशी कुरकुरीत भाजणीची चकली बंद डब्यात एक दोन महिने आरामात टिकते.

चकलीच्या भाजणीची आणि चकलीची रेसिपी माझ्या Varsha’s House of Foods’ या युट्युब चॅनलवर आपल्याला पहायला मिळतील.  

भाजणी  https://www.youtube.com/watch?v=KPG-ILzqUao 

चकली   https://www.youtube.com/watch?v=dVzOaVPn0X4


चकलीबद्दलची माहिती आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. 

थँक यू.

वर्षा कंधारकर

औरंगाबाद.

Comments

Post a Comment